Worn Beauty

Not everything needs a shine, after all. If you leave a Pelham Blue Gibson Trini Lopez guitar in the case for fifty years, it will look like it was just delivered from the factory. But if you take it in your hands, show it to the sun, let it breathe, sweat on it, and ……. PLAY it, over time the finish will turn a unique shade. And each instrument ages entirely differently. To me, that is beauty. Not the gleam of prefabricated perfection, but the road-worn beauty of individuality, time, and wisdom.

– The Storyteller – by Dave Grohl

सु सुखाचा

“मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं…”, प्रशांत दामलेंच्या एका सुप्रसिद्ध नाटकातील हे गीत ऐकलं की दरवेळी मीही थोडा वेळ माझ्या लेखी सुखाची व्याख्या कशी करावी त्याच्या प्रयत्नाला लागतो. असाच हा एक प्रयत्न.

सगळ्यात पहिला आणि महत्वाचा, आजवर आणि ह्या क्षणी सुद्धा आपण घेत असलेला श्वास. जीवनावश्यक असा हा प्राणवायू आपल्याला चक्क मोफत मिळतो, तोही अविरत. त्याबद्दल आपण परमेश्वराचे ऋण फेडण्याचा उत्तम मार्ग म्हणजे केवळ मनात कृतज्ञता बाळगत स्वतः आनंदी राहणे व इतरांना आनंद वाटणे. येणारी प्रत्येक नवी सकाळ ग्राह्य धरण्याऐवजी दररोजचा दिवस काहीतरी चांगलं करत राहण्यासाठी आपल्याला मिळालेली एक नविन सुसंधी असं मानु या का? जमेल? माठातल्या थंडगार पाण्याचा घोट घेताना सुध्दा आपण ठरवलं तर खुप समाधान मानता येईल. विचार केला तर वापराचं दूरच पण प्यायचं स्वच्छ पाणी मिळणं देखिल कितीतरी लोकांसाठी रोजच एक आव्हान आहे. असं सारं असताना, सुनियमित वेळांवर सुग्रास अन्नाचा घास घेताना जर आपल्याला कृतकृत्य वाटत नसेल तर खरंच आश्चर्य वाटायला हवं.

सात पिढ्या बसून खातील एवढा धनसंचय करण्याची आपल्या पालकांची वृत्ती नव्हती हेही आपलं सुदैवच. त्याउलट त्यांनी आपल्याला सुशिक्षित केले. त्यापेक्षाही आवश्यक म्हणजे सुसंस्कार दिले, आत्मविश्वास दिला. परिस्थितीला दोष ना देता कष्टाने आणि संयमाने कितीही मोठ्या अडचणीतून मार्ग काढता येतो हेही शिकवले. चार लोकांशी जुळवून घेतानाच स्वतःची म्हणुन एक ओळख निर्माण करण्याची प्रेरणा दिली. बऱ्यावाईट प्रसंगांत एकमेकांची सोबत कशी करावी हे स्वतःच्या आचरणातून दाखवले. एक ना अनेक, आयुष्यात त्यांना लागलेल्या असंख्य ठेचांतून शिकलेले धडे आपल्याला गिरवायला लावून शहाणे करून टाकले. असे पालक मिळणे हे आपलं सौभाग्य नव्हे का?

मोजकी का होईना, पण जीवाभावाची अशी माणसं प्रत्येकाच्या वाट्याला आलेली असतात. कौतुकाची असो वा आधाराची, अशा माणसांची आपल्या पाठीवरची थाप म्हणजे पुढे चालत राहण्यासाठी हवा असलेला ‘बूस्टर डोस’ खरा! चांगली माणसं आपल्या जीवनाला सुंदर बनवण्यास प्रयत्नरत असतातच पण त्यांच्या अस्तित्वाची आपणही जाणीव ठेवली तर किती अमूल्य ठेवा आहे आपल्याकडे ते आपल्याच लक्षात येईल. सुस्वभावी मनमिळावु व्यक्ति आपल्या नकळत आपलं जगणं सुसह्य करत असतात. ते आपले गुण वाखाणतात पण त्रुटींकडे दूर्लक्ष करत असतात. हे थोडं आत्मपरीक्षण केलं तर आपोआपच समजेल.

सुमधूर संगीत, सुरेख चित्रकला, सुसमृद्ध साहित्य, तालबद्ध नृत्य, अशा कला-गुणांची जाण, निसर्गाची ओढ, थोडंसं गांभीर्य, आणि थोडासा खेळकरपणा, हे सगळं आयुष्याची गोडी वाढवतं. जे जे सुंदर न मागता लाभलंय, त्याची पारख जर असेल तर आपल्याला आनंदी आणि सुखी राहणं काय अवघड आहे? आपली झोळी खरंतर कधीच रिकामी नसते. ज्या वेळी जे जे आवश्यक ते आपल्याजवळ असतेच. आपण सुखाच्या शोधात प्रवास करत असतो पण आपले सुख कायमच आपल्या सोबत असते. जणू कस्तुरीमृगाप्रमाणे आपली अवस्था असते. आपण सुख बाहेरून ‘मिळवू’ शकत नाही तर आपण अंतरंगातून सुखी ‘असू’ शकतो. हा झाला माझा विचार, थोडा अनुभवलाय, थोडा अजुन जाणून घेतोय. तुमचं काय?

Cheers! 🙂